समास पाचवा : हरिकथा लक्षण॥ श्रीराम ॥मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रस्न । सावध होऊन विचक्षण । परिसोन आतां ॥ १ ॥ हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी । जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥ सोनें आणि परिमळे । युक्षदंडा लागती फळें । गौल्य माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥ तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । वित्पन्न आणि वादरहित । तरी हेहि अपूर्वता ॥ ४ ॥ रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी । निराभिमानें वर्ते जनीं । तरी हेहि अपूर्वता ॥ ५ ॥ मछर नाहीं जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी । चतुरांग जाणें मानसीं । अंतरनिष्ठ ॥ ६ ॥ जयंत्यादिकें नाना पर्वें । तीर्थें क्षेत्रें जें अपूर्वें । जेथें वसिजे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥ तया तिर्थातें जे न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती । तया पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥ निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । दोहिकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥ पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती । प्रतिपादून उछेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥ ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभये पंथा । परिस लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥ सगुणमूर्तीपुढें भावें । करुणाकीर्तन करावें । नानाध्यानें वर्णावें । प्रतापकीर्तीतें । १२ ॥ ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढवे । सर्वांतरीं हेलावे । प्रेमसुख ॥ १३ ॥ कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४ ॥ देवाचें वर्णावें वैभाव । नाना प्रकारें महत्त्व । सगुणीं ठेउनियां भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥ लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची । नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥ नम्र होऊन राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणी । करताळिका नृत्य वाणीं । नामघोषें गर्जावें ॥ १७ ॥ येकांची कीर्ति येकापुढें । वर्णितां साहित्य न पडे । म्हणोनियां निवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥ मूर्ती नस्तां सगुण । श्रवणीं बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥ नाहीं मूर्ती नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन । तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्य ॥ २० ॥ श्रुंघारिक नवरसिक । यामधें सांडावें येक । स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णुं नये कीं ॥ २१ ॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वता । धारिष्टापासून श्रोता । चळे तत्काळ ॥ २२ ॥ म्हणऊन तें तजावें । जें बाधक साधकां स्वभावें । घेतां अंतरीं ठसावें । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन । कैचें आठवेल ध्यान । ईश्वराचें ॥ २४ ॥ स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरीं भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥ हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष्य येक जरी आकळे । ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानीं गुंतलें मन । कैचें आठवेल जन । निशंक निर्ल्लज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥ रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसीं वित्पन्न । अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥ छपन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणें अन्न । कळावंतांचें जें मन । तें कळाकार जालें ॥ ३० ॥ श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणावी अवकळा । देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥ सर्पीं वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी । नाना कळा देवासी । आड तैस्या ॥ ३२ ॥ सांडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न । तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ येक मन गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी । बळेंचि धरुनियां चोरीं । शुश्रृषा घेतली ॥ ३४ ॥ करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरुनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥ भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी । कळावंतां तैसी परी । कळेनें केली ॥ ३६ ॥ मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी । तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥ जयास हरिकथेची गोडी । उठे नीच नवी आवडी । तयास जोडली जोडी । सर्वोत्तमाची ॥ ३८ ॥ हरिकथा मांडली जेथें । सर्व सांडून धावे तेथें । आलस्य निद्रा दवडून स्वार्थें । हरिकथेसि सादर ॥ ३९ ॥ हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी । साहेभूत सर्वांपरीं । साक्षपें होये ॥ ४० ॥ या नावाचा हरिदास । जयासि नामीं विश्वास । येथून हा समास । संपूर्ण जाला ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे हरिकथालक्षणनिरूपण समास पांचवा ॥