अभ्यासकांसाठी निवेदन

सस्नेह नमस्कार विनंती विशेष.

वैशाख कृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या, भक्तवत्सल भक्ताभिमानी, सद्‍गुरू मातु:श्री सौ शकुंतलाताई आगटे यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून 'अभ्यास कोश' नूतन स्वरूपात सादर करत आहोत. नवीन रंग, रूप व तंत्रज्ञानासोबत नवीन विभाग सुद्धा आता उपलब्ध आहेत. श्रीज्ञानेश्वरीबरोबर श्री एकनाथी भागवत आणि श्री दासबोध हे ग्रंथ डिजिटल स्वरूपात वाचायला मिळतील, व त्यामधील ओव्या शब्द अथवा क्रमांकाने शोधता येतील. या व्यतिरिक्त श्रीवामनराज प्रकाशनातील ग्रंथातील संदर्भ व ग्रंथांची माहितीदेखील जोडली आहे. वरील पैकी (मोबाईल वर उजव्या कोपऱ्यातील) पर्यायांमधून आपल्याला इच्छित विभाग निवडता येईल.

प. पू. सद्‍गुरू सौ ताईंच्या कृपाप्रेरणेने सुरु झालेला हा प्रकल्प साधक-अभ्यासकांच्या उपयोगी ठरो, ही त्यांच्या सुकोमल श्रीचरणी प्रार्थना!

 
संतसाहित्य अभ्यास सहाय्यक

श्रीवामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांमधून सद्‍गुरू परंपरेतील विभूतींनी धर्मग्रंथ आणि संतसाहित्यामधील सखोल व विस्तृत ज्ञान विविध स्वरूपात निरोपिले आहे. यामध्ये श्रीज्ञानदेवी आणि संतसाहित्य निरूपण, संस्कृत सूत्रग्रंथ, संशोधनपर वाङ्मय, भाष्य आणि अनुवाद असे अनेक ग्रंथप्रकार समाविष्ट आहेत. पारमार्थिक विषयांबद्दल सर्वांगीण चिंतन करण्यास सहाय्यता मिळावी, आणि अध्यात्म-अभ्यासाला मदत व्हावी, यासाठी सद्‍गुरू प्रेरणेने ही सुविधा कार्यान्वित केली आहे.