समास चवथा : स्वगुणपरीक्षा (क)॥ श्रीराम ॥लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली । बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं । ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥देवसेंदिवसा खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला । कन्या उपवरी जाल्या, त्यांला- । उजवावया द्रव्य नाहीं ॥ ३॥मायेबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन । तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥ ४॥भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं । देवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ॥ ५॥ऐसी घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं । तेणें प्राणीयांस लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६॥कन्या उपवरी जाल्या । पुत्रास नोवर्या आल्या । आतां उजवणा केल्या । पहिजेत कीं ॥ ७॥जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी पुन्हां लोकलाज जाली । म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्र्‌यें ॥ ८॥ऐसी लोकलाज होईल । वडिलांचें नांव जाईल । आतां रुण कोण देईल । लग्नापुरतें ॥ ९॥मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें । ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें ॥ १०॥आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं । सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥ ११॥पती अवघीच मोडली । वस्तभाव गाहाण पडिली । अहा देवा वेळ आली । आतां डिवाळ्याची ॥ १२॥कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडारेडा । कांहीं पैका रोकडा । कळांतरें काढिला ॥ १३॥ऐसें रुण घेतलें । लोकिकीं दंभ केलें । सकळ म्हणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४॥ऐसें रुण उदंड जालें । रिणाइतीं वेढून घेतलें । मग प्रयाण आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५॥दोनी वरुषें बुडी मारिली । नीच सेवा अंगीकारिली । शरीरें आपदा भोगिली । आतिशयेंसीं ॥ १६॥कांहीं मेळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपासीं । मग पुसोनियां स्वामीसी । मुरडता जाला ॥ १७॥तंव तें अत्यंत पीडावलीं । वाट पाहात बैसलीं । म्हणती दिवसगती कां लागली । काये कारणें देवा ॥ १८॥आतां आम्ही काये खावें । किती उपवासीं मरावें । ऐसियाचे संगतीस देवें । कां पां घातलें आम्हांसी ॥ १९॥ऐसें आपुलें सुख पाहाती । परी त्याचें दुःख नेणती । आणी शक्ती गेलियां अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २०॥असो ऐसी वाट पाहतां । दृष्टीं देखिला अवचिता । मुलें धावती, ताता । भागलास म्हणौनी ॥ २१॥स्त्री देखोन आनंदली । म्हणे आमुची दैन्यें फिटली । तंव येरें दिधली । गांठोडी हातीं ॥ २२॥सकळांस आनंद जाला । म्हणती आमुचा वडील आला । तेणें तरी आम्हांला । आंग्या टोप्या आणिल्या ॥ २३॥ऐसा आनंद च्यारी देवस । सवेंच मांडिली कुसमुस । म्हणती हें गेलियां आम्हांस । पुन्हां आपदा लागती ॥ २४॥म्हणौनी आणिलें तें असावें । येणें मागुतें विदेशास जावें । आम्ही हें खाऊं न तों यावें । द्रव्य मेळऊन ॥ २५॥ऐसी वासना सकळांची । अवघीं सोईरीं सुखाचीं । स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखाच लागली ॥ २६॥विदेसीं बहु दगदला । विश्रांती घ्यावया आला । स्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७॥पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहूर्ताची । वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वटे ॥ २८॥माया मात्रा सिद्ध केली । कांहीं सामग्री बांधली । लेंकुरें दृष्टीस पाहिलीं । मार्गस्त जाला ॥ २९॥स्त्रियेस अवलोकिलें । वियोगें दुःख बहुत वाटलें । प्रारब्धसूत्र तुकलें । रुणानबंधाचें ॥ ३०॥कंठ सद्गदित जाला । न संवरेच गहिवरला । लेंकुरा आणी पित्याला । तडातोडी जाली ॥ ३१॥जरी रुणानुबंध असेल । तरी मागुती भेटी होईल । नाहीं तरी संगती पुरेल । येचि भेटीनें तुमची ॥ ३२॥ऐसीं बोलोन स्वार होये । मागुता फीरफिरों पाहे । वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३॥आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारौद्वेगें । दुःखवला प्रपंचसंगें । अभिमानास्तव ॥ ३४॥ते समईं माता आठवली । म्हणे म्हणे धन्य ते माउली । मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५॥आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती । वियोग होतां आक्रंदती । ते पोटागि वेगळीच ॥ ३६॥पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी । दगदला देखोन अंतरीं । त्याच्या दुःखें दुःखवे ॥ ३७॥प्रपंच विचारें पाहातां । हें सकळ जोडे न जोडे माता । हें शरीर जये करितां । निर्माण जालें ॥ ३८॥लांव तरी ते माया । काय कराविया सहश्र जाया । परी भुलोन गेलों वायां । मकरध्वजाचेनी ॥ ३९॥या येका कामाकारणें । जिवलगांसिं द्वंद घेणें । सखीं तींच पिसुणें । ऐसीं वाटतीं ॥ ४०॥म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन । जे मायेबापाचें भजन । करिती न करिती, मन- । निष्ठुर जिवलगांसीं ॥ ४१॥संगती स्त्रीबाळकाची । आहे साठी जन्माची । परी मायेबापीं कैंचीं । मिळतील पुढें ॥ ४२॥ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें । परी ते समईं नाहीं कळलें । मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचा डोहीं ॥ ४३॥हे सखीं वाटती परी पिसुणें । मिळाली वैभवाकारणें । रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४॥आता भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें । रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५॥ऐसी वेवर्धना करी । दुःख वाटलें अंतरीं । चिंतेचिये माहापुरीं । बुडोन गेला ॥ ४६॥ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला । ईश्वरीं कानकोंडा जाला । कुटुंबकाबाडी ॥ ४७॥या येका कामासाठीं । जन्म गेला आटाटी । वय वेचल्यां सेवटीं । येकलेंचि जावें ॥ ४८॥ऐसा मनीं प्रस्तावला । क्षण येक उदास जाला । सवेंचि प्राणी झळंबला । मायाजाळें ॥ ४९॥कन्यापुत्रीं आठवलीं । मनींहुनि क्षिती वाटली । म्हणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५०॥मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त जालें । मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१॥आरुण्यरुदन करितां । कोणी नाहीं बुझाविता । मग होये विचारिता । आअपुले मनीं ॥ ५२॥आतां कासया रडावें । प्राप्त होतें तें भोगावें । ऐसे बोलोनिया जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३॥ऐसा दुःखें दगदला । मग विदेशाप्रती गेला । पुढे प्रसंग वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४॥इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ॥ ४॥