समास दहावा : देहान्तनिरूपण॥ श्रीराम ॥मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें असत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहतां ॥ १॥सत्य कळावयाकारणें । बोलिलीं नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २॥असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३॥वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चयो करिती । तरि न ये आत्मप्रचीती । सत्य स्वरूप ॥ ४॥सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखतदेखतां ॥ ५॥ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६॥मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि आपण । तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७॥तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें । निजस्वरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८॥प्रारब्धें टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवर ॥ ९॥ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ॥ १०॥साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ । साधू न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥ ११॥पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तोंचि नित्यमुक्त ॥ १२॥उत्तरायण तें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३॥शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवामरण । अंतीं रहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४॥इतुकें नलगे योगियासी । तो जितचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यासी । दिधली तेणें ॥ १५॥देहाचा अंत बरा झाला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६॥जनांचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७॥जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८॥जरी केलें ईश्वरभजन । तरी तो होइजे पावन । जैसें वेव्हारितां धन । राशी माथां लाभे ॥ १९॥दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना । ऐसें हें वाक्य जनां । ठाउकेंचि आहे ॥ २०॥न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा । तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१॥जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती । असो जे जे ऐसें करिती । ते ते पावती तैसेंचि ॥ २२॥एवं न करितां भगवद्भजन । अंतीं न होइजे पावन । जरी आलें बरवें मरण । तरी भक्तिविण अधोगती ॥ २३॥म्हणोन साअधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें । शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं । अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥ २५॥साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला । हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ २६॥अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन । परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७॥जो जन्मलाचि नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ॥ २८॥स्वरूपानुसंधानबळें । सगळीच माया नाडळे । तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९॥तो जित असतांचि मेला । मरणास मारून जियाला । जन्म मृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३०॥तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा । दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१॥असो ऐसे साधु जन । त्यांचें घडलिया भजन । तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२॥सद्गुरूचा जो अंकित साधक । तेणें केलाच करावा विवेक । विवेक केलिया तर्क । फुटे निरूपणीं ॥ ३३॥हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें । तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४॥जो संतांसी शरण गेला । तो संतचि होऊन ठेला । इतर जनां उपयोगा आला । कृपाळुपणें ॥ ३५॥ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान । सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥ ३६॥गुरुभजनाचेनि आधारें । निरूपणाचेनि विचारें । क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७॥परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरूचें भजन । सद्गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८॥देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें । भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरूचें ॥ ३९॥शरणागताची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसें बाळका वाढवी माता । नाना यत्नेंकरूनी ॥ ४०॥म्हणोनि सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य । सद्गुरुवीण समाधान । आणिक नाहीं ॥ ४१॥ सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । येथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२॥ सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं । जयांस न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३॥ तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें । याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४॥ जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक । तयास सांपडे एक । निश्चयो ज्ञानाचा ॥ ४५॥ ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत । सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६॥ प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहतां मिळे । आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७॥ तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचा उपाय । मूर्खासि हें कळे काय । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८॥ आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें । शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९॥ जेथें नेति नेति म्हणती श्रुती । तेथें न चले भाषाव्युत्पत्ती । परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥ ५०॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥